बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : लोणी काळभोर परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सात जणांना अटक करण्यात आली असून सुमारे २ लाख ६७ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नयन बारजवळ, थेऊर फाटा येथे सुरू असलेल्या ‘सोरट पंतीपाकुळी’ व ‘कल्याण मटका’ या जुगार प्रकारांवर लोणीकाळभोर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

या कारवाईत जुगार चालविणारे सुजित हरी बोडके (वय ३६) व करण सुरेश काळे (वय २९) यांच्यासह जुगार खेळणारे विशाल वाघमारे, सतिष चौडकर, बंटी गायकवाड, मंदार हगवणे व शिवाजी चव्हाण यांना अटक करण्यात आली.

छाप्यात ७,८३० रुपये रोख रक्कम, सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल हँडसेट, तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २,६७,८३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, या जुगार अड्ड्याचा मुख्य मालक विकास राजुभाऊ कांबळे (वय ३२) व इतर दोन अनोळखी आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे आणि त्यांच्या पथकाने केली.
या धाडसी कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसण्यास मदत झाली असून भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पन्हाळे यांनी सांगितले.