सुवर्णा कांचन, मुख्य संपादक
पुणे : मतदार यादीतील त्रुटी, २००२ पूर्वीच्या नोंदीतील गोंधळ आणि हजारो नागरिकांची नावे अद्यापही मतदार यादीत न लागल्याच्या मुद्द्यावर पंचायत समिती सदस्य कोमल गणेश कांबळे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“२००२ च्या आधी मतदार एवढे जागरूक नव्हते की मतदान कार्ड काढलेच पाहिजे, त्यावेळी जनजागृतीही नव्हती. मग त्या काळात ज्यांची नावे लागली नाहीत, ते भारताचे नागरिक नाहीत का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोमल कांबळे म्हणाल्या, अनेक गोरगरीब नागरिक त्या काळात मतदान प्रक्रियेपासून वंचित राहिले. काहींनी मतदान कार्ड काढले, मात्र त्यावर आई-वडिलांची नावे चुकीची टाकण्यात आली. या चुका नेमक्या कोणाच्या आहेत, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे.
“आज आयोग सांगतो की २००२ मधील नोंदीच्या आधारे पुढील पिढ्यांची नावे जोडली जातील. मात्र ज्यांची नावे त्या काळातच लागली नाहीत, त्यांनी आता काय करायचे?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी आरोप केला की शासनाने नियुक्त केलेले अधिकारी, बीएलओ आणि संबंधित यंत्रणांनी १०० टक्के काम पूर्ण केले नाही. त्यामुळे हजारो पात्र नागरिक आजही मतदार यादीपासून दूर आहेत. “असे अनेक मतदार आहेत ज्यांनी आठ ते नऊ वेळा फॉर्म भरले, तरी त्यांची नावे मतदार यादीत आली नाहीत. एवढ्या वेळा अर्ज करूनही नाव का लागले नाही, याचे कारण ना मतदारांना समजले ना प्रशासनाने स्पष्ट केले,” असे कोमल कांबळे म्हणाल्या.
मतदार यादीतील त्रुटींमुळे सामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली. “ज्या लोकांची नावे २००२ मध्ये राहून गेली, त्यांच्यासाठी शासनाने विशेष मोहीम आणि ठोस उपाययोजना राबवली पाहिजे.
नागरिकांना पुन्हा पुन्हा फॉर्म भरायला लावणे आणि त्यानंतरही नाव न लावणे, हा प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणून पात्र नागरिकांची नावे तातडीने समाविष्ट करावीत, तसेच जुन्या नोंदीतील चुका दुरुस्त करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणीही कांबळे यांनी केली आहे.
बापुराव चौधरी, उपसंपादक