बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : विद्यार्थ्यांना जागतिक संस्कृती व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने ‘स्वान’ (Swan) फाऊंडेशनतर्फे आयोजित सिंगापूर शैक्षणिक व प्रेक्षणीय सहल उत्साहात पार पडली. पाच दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थळांना भेट देत ज्ञानाबरोबरच मनोरंजनाचाही आनंद लुटला. सहल पूर्ण करून भारतात परतल्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते कुसगाव (मिसिंग लिंक प्रकल्प परिसर) येथे करण्यात आला.

स्वान सोशल स्टडी अँड रिसर्च फाऊंडेशन आणि डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवकुंड यांच्या वतीने टेक्नसिंक इनोव्हेशन्स प्रा. लि. आणि चेन सेन्स इंडिया प्रा. लि. यांच्या आर्थिक सहकार्याने ग्रामीण महाराष्ट्रातील १३ गुणवंत विद्यार्थ्यांची या पूर्णतः प्रायोजित सहलीसाठी निवड करण्यात आली होती. ही निवड ‘डॉ. ए. बी. गायकवाड नॉलेज नेस्ट परीक्षा’द्वारे करण्यात आली. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परीक्षेत राज्यभरातील ४,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सत्कार सोहळ्यावेळी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अश्विनी कांबळे, सचिव विकास टाकळीकर, सीईओ प्रसादराजे भोपळे, तसेच टेक्नसिंकचे अमन पाचगरे आणि चेअरमन गणेश लोरे उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, या उपक्रमात इंग्रजी, सेमी-इंग्रजी तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. यापूर्वी १५ विद्यार्थ्यांना नासामध्ये आणि १५ विद्यार्थ्यांना सिंगापूर येथे नेण्यात आले असून, लवकरच ७ विद्यार्थ्यांना संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पॉलिसी डिबेटसाठी नेण्याचा मानस आहे.

तसेच ‘नॉलेज नेस्ट परीक्षा २०२६’ लवकरच आयोजित करण्यात येणार असून, त्यातून निवडलेल्या ३० विद्यार्थ्यांना अमेरिका, सिंगापूर आणि संयुक्त राष्ट्र येथे शैक्षणिक सहलीची संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

यावेळी अनिलकुमार गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “हा अत्यंत अभिनव उपक्रम असून देशाच्या भविष्यासाठी मोलाचे योगदान आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल.” त्यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

सहलीची सुरुवात सिंगापूरमधील प्रसिद्ध चांगी विमानतळावरील ‘ज्वेल’च्या भेटीने झाली. त्यानंतर शहरदर्शनातून आधुनिकता आणि इतिहासाचा संगम अनुभवता आला. ‘आर्ट अँड सायन्स म्युझियम’मध्ये कला व विज्ञानाचा अनोखा मेळ पाहता आला, तर ‘गार्डन्स बाय द बे’मधील ‘फ्लॉवर डोम’ आणि ‘क्लाउड फॉरेस्ट’मध्ये दुर्मिळ वनस्पती व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले.
मनोरंजनासाठी ‘युनिव्हर्सल स्टुडिओ’ हे सहलीचे प्रमुख आकर्षण ठरले. विविध राईड्स आणि चित्रपटसृष्टीचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.

‘सेंटोसा आयलंड’वरील केबल कार प्रवास, ‘मादाम तुसाद’मधील मेणाचे पुतळे आणि ‘विंग्स ऑफ टाइम’ लेझर शोने सहलीला विशेष रंगत आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *