सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : राज्यात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या हवेली तालुका पंचायत समितीचा कारभार गेली अनेक वर्षे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जुन्या जिल्हा परिषद इमारतीतून चालविला जात आहे. मात्र, या इमारतीची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, सभागृहासह विविध विभागांची अवस्था जीर्ण झाली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मागील १५ ते २० दिवसांपूर्वी आमदार ज्ञानेश्वर कटके आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय पाणीटंचाई व पाणंद रस्त्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सभागृहातील माईक, साऊंड सिस्टीमसह अन्य सुविधांची दुरवस्था पाहून दोन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यावेळी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे इमारत दुरुस्तीसाठी निधीची मागणी केल्याची माहिती दिली. तसेच आमदार निधीतूनही मदत करण्याची विनंती त्यांनी आमदार कटके व तापकीर यांच्याकडे केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही आमदारांनी प्रत्येकी १० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पंचायत समिती इमारतीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सभापती युवराज काकडे यांनी दोन्ही आमदारांचे आभार मानले आहेत. तसेच लवकरच इमारत दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात येणार असून, अद्ययावत कोनशिलेचे भूमिपूजन आमदार ज्ञानेश्वर कटके आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बापुराव चौधरी उपसंपादक