सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस नवोन्मेष क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत MIT Art, Design and Technology University च्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण केले आहे. ‘टीम स्कायट्रेक’ने विकसित केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स अंतर्गत एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे विमान पूर्णपणे स्वतः विकसित केले असून, या प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग अॅस्पिरंट्स’ (CRIEYA) मार्फत विद्यापीठाने अर्थसहाय्य केले आहे.

९.२५ मीटर एवढ्या विशाल विंगस्पॅनसह आणि २६१ किलो वजन असलेले हे विमान भारतात तयार झालेले सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. या प्रकल्पासाठी CRIEYAकडून तब्बल ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

यशस्वी उड्डाणानंतर या विमानाची आता India Book of Records आणि Asia Book of Records मध्ये भारतातील सर्वाधिक वजनाचे आरसी विमान (२६१ किलो) तसेच सर्वांत मोठ्या विंगस्पॅनचे आरसी विमान (९.२५ मीटर) म्हणून नोंद झाली आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ‘इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या अधिकाऱ्यांकडून ‘प्रोजेक्ट गरुडा’ला विक्रमाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. पूर्णपणे विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रकल्प अनुभवाधारित शिक्षण, प्रगत एरोस्पेस संशोधन आणि विद्यार्थी-केंद्रित नवोन्मेषाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

या प्रकल्पाला विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू Dr. Mangesh Karad यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुलगुरू Dr. Rajesh S., प्रोवोस्ट Dr. Sayali Gankar, प्र-कुलगुरू (टेक्नॉलॉजी क्लस्टर) Dr. Ramchandra Pujeri, प्र-कुलगुरू (इनोव्हेशन क्लस्टर) Dr. Mohit Dubey, कुलसचिव Dr. Mahesh Chopde यांचे सहकार्य लाभले. अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता Dr. Sudarshan Sanap, एरोस्पेस विभागप्रमुख Dr. Kamlesh Kulkarni, Dr. Sunil Dingre तसेच CRIEYAचे मुख्य कार्यकारी अधिकारी Dr. Santosh Darade यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी विमानाची रचना, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन, एरोडायनॅमिक्स आणि स्थैर्य विश्लेषण, पिक्सहॉक फ्लाइट कंट्रोलर प्रणाली, आरटीके-जीपीएस आधारित नेव्हिगेशन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम, फ्लाइट टेस्टिंग, रिमोट पायलटिंग, स्ट्रक्चरल व्हॅलिडेशन आणि प्रोपल्शन ऑप्टिमायझेशन ही सर्व कामे स्वतंत्रपणे पार पाडली.

दोनदा अपयश; तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण
गेल्या जवळपास चार वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक आणि कार्यात्मक अडचणींचा सामना करावा लागला. प्रोपल्शन सिस्टीममधील अडथळे, स्ट्रक्चरल डिझाईनमधील बदल, फ्लाइट कंट्रोलर ट्युनिंग, प्रतिकूल हवामान, धावपट्टीच्या मर्यादा आणि अपयशी चाचण्या अशा अनेक आव्हानांवर त्यांनी मात केली.

२०२४ मधील प्रारंभीच्या चाचण्यांमध्ये आलेल्या अपयशानंतरही विद्यार्थ्यांनी फ्लाइट डेटा विश्लेषण, नव्याने डिझाईन, एरोडायनॅमिक्स व्हॅलिडेशन आणि सिस्टिमॅटिक टेस्टिंगच्या माध्यमातून विमानात सातत्याने सुधारणा केल्या. अखेर, ४ मे २०२६ रोजी Dhule येथील धावपट्टीवर या विमानाने यशस्वी टेक-ऑफ, नियंत्रित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग करत भारतीय विद्यार्थी-नेतृत्वाखालील एरोस्पेस संशोधनात नवा विक्रम प्रस्थापित केला.

‘CRIEYA’कडून ४८ लाख रुपयांचा निधी
या प्रकल्पाची संशोधन क्षमता आणि शैक्षणिक महत्त्व लक्षात घेऊन CRIEYAने तीन टप्प्यांत ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना १:६ स्केल प्रोटोटाइप विकसित करणे, अत्याधुनिक टी-मोटर्स तंत्रज्ञानाद्वारे प्रोपल्शन सिस्टीममध्ये सुधारणा, स्ट्रक्चरल मजबुतीकरण, डायनॅमिक थ्रस्ट आणि टॅक्सी टेस्टिंग तसेच टेलिमेट्री आणि कंट्रोल सिस्टीम अधिक सक्षम करण्यास मदत झाली.

भविष्यातील दिशा
या प्रकल्पाला पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्कायडायव्हर Sheetal Mahajan आणि Thrust Aircraft Pvt. Ltd. चे संचालक Captain Amol Yadav यांचेही मार्गदर्शन लाभले. भविष्यात ‘टीम स्कायट्रेक’ ई-व्हीटॉल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म-ड्रोन सिस्टीमसाठी मदरशिप प्लॅटफॉर्म तसेच संरक्षण आणि नागरी वापरासाठी प्रगत यूएव्ही संशोधन व्यासपीठ विकसित करण्याच्या दिशेने काम करणार आहे.

‘ गरुडा’ची वैशिष्ट्ये
भारतातील सर्वाधिक वजनाचे आरसी विमान – २६१ किलो
भारतातील सर्वात मोठ्या विंगस्पॅनचे आरसी विमान – ९.२५ मीटर
संशोधन व उड्डाणासाठी आतापर्यंतचा खर्च – ४८ लाख रुपये
टेक-ऑफसाठी आवश्यक अंतर – २०० मीटर
उड्डाण क्षमता – १० मिनिटे
कमाल उंची – १०० मीटर (एजीएल)
पेलोड क्षमता – १०० किलोग्रॅम
कमाल वेग – ८० किमी प्रतितास
बॅटरी प्रकार – Li-Po 220 AH
बॅटरी व्होल्टेज – १०० व्होल्ट

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *