सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी आकाश बापू म्हस्के याचा लहान भाऊ अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६) याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय उर्फ बाळू म्हस्के याच्यावर पाळत ठेवून त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने २० मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता राजश्री शाहू बँक चौक, बालाजीनगर, धनकवडी येथे हल्ला करण्यात आला. तो रिक्षामध्ये बसलेला असताना आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गु.र. नं. २०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. तपासामध्ये ऋषिप्रसाद मोहन आंबट हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या वडिलांकडे चौकशी केली असता तो इतर साथीदारांसह लोणावळा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा येथे शोधमोहीम राबविली. दरम्यान, आरोपी पुणे-मुंबई महामार्गावरील बेहेरगाव, कार्ला परिसरातील एकविरा देवीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. आरोपी आवेज अश्पाक शेख हा साथीदारांसह तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१) आवेज अश्पाक शेख (वय २६, रा. गणेश पेठ, पुणे)
२) अमन फारुख बागवाले (वय २१, रा. भवानी पेठ, पुणे)
३) वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, रा. भवानी पेठ, पुणे)
४) ऋषिप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. नाना पेठ, पुणे)
५) आफताब शरीफ सय्यद (वय २२, रा. कोंढवा खुर्द, पुणे)
तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलिस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त शैलेंद्र संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित जाधव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
बापुराव चौधरी उपसंपादक