सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : संवेदनशील गुन्ह्यांचा तपास, महिलांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा समतोल साधत महाराष्ट्र पोलीस दलात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पवार यांनी कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ठसा उमटवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रियांका पवार (प्रियांका सुरेश वांजळे) या मूळच्या पुणे जिल्ह्यातील अहिरे गावच्या असून त्यांचे सासर लातूर येथे आहे. सामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या प्रियांका यांनी शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर यशाचा मार्ग निवडला. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतून त्यांनी एम.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत २७ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र पोलिस दलात प्रवेश केला.

पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. सन २०१६ ते २०२१ या कालावधीत मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत शिवाजी पार्क पोलिस स्टेशन, दादर विभाग तसेच शाहूनगर पोलीस स्टेशन, धारावी विभाग येथे त्यांनी जबाबदारीने सेवा बजावली. विविध गुन्हे आणि संवेदनशील प्रकरणे हाताळताना त्यांनी तपासातील कार्यक्षमता आणि लोकांशी संवाद कौशल्य यांचा प्रभावी संगम साधला.
यानंतर लोणीकंद आणि येरवडा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असताना महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील गुन्हे तसेच कौटुंबिक वाद यांसारख्या प्रकरणांमध्ये त्यांनी प्रभावी तपासासोबत समुपदेशनालाही प्राधान्य दिले.
तणावग्रस्त कुटुंबांमध्ये संवाद निर्माण करून कुटुंब संस्था टिकविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मानसिक विकलांग तसेच अनाथ बालकांना सामाजिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेत समाजाभिमुख कामाची वेगळी छाप निर्माण केली.
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यावरील कायदेशीर बाबी याबाबत मार्गदर्शन केले. युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
सामाजिक कार्याची विशेष आवड असल्याने त्या विविध स्तरांतील नागरिकांशी सातत्याने संवाद साधत असतात. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातून केला आहे.
सध्या त्या सीआयडी पुणे ग्रामीण येथे कार्यरत असून विविध गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. संघर्ष, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर उभी राहिलेली त्यांची वाटचाल आज अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक