सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : बीएसएनएल आणि एमटीएनएल पेन्शनधारकांनी १ जानेवारी २०२६ पासून देय असलेली आयडीए वाढ तात्काळ लागू करावी, तसेच जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीतील थकबाकी अदा करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सातारा रोड येथील प्रधान महाप्रबंधक कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले.

कमिटी ऑफ बीएसएनएल अँड एमटीएनएल पेन्शनर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित या आंदोलनात पुण्यासह विविध भागांतील सुमारे ५०० पेन्शनधारक सहभागी झाले होते. तीव्र उन्हाळ्याची पर्वा न करता पेन्शनधारकांनी उत्साहाने आंदोलनात सहभाग घेतला. हे आंदोलन देशभर सुरू असलेल्या आंदोलन मालिकेचा एक भाग होते.

आंदोलनाला कॉम्रेड नागेशकुमार नलावडे, कॉ. चंद, कॉ. वृषाली दाभोळकर, कॉ. प्रकाश घोरपडे, कॉ. संदीप गुळुंजकर, कॉ. कुलकर्णी आणि कॉ. आनंद मुडवीकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कॉ. गणेश भोज यांनी केले, तर आभार प्रदर्शन कॉ. नितीन कदम यांनी केले. बीएसएनएलमधील विविध कामगार संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

पेन्शनधारकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक उपक्रम विभागाने (डीपीई) २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये १ जानेवारी २०२६ पासून लागू होणारी आयडीए वाढ अधिसूचित करण्यात आली होती. मात्र, त्यात आर्थिक परिणामासंदर्भातील असामान्य अट समाविष्ट करण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली.

देशभरातील सुमारे चार लाख पेन्शनधारकांनी १६ एप्रिल २०२६ रोजी आंदोलन केल्यानंतर डीपीईने २४ एप्रिल २०२६ रोजीच्या पुढील आदेशात १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारी आयडीए वाढ जाहीर करताना आर्थिक परिणामाची अट वगळली. तरीदेखील १ जानेवारी २०२६ पासून देय असलेली वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

पेन्शनधारकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
१) १ जानेवारी २०२६ पासून देय असलेली आयडीए/डीआर वाढ तात्काळ लागू करून जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीतील थकबाकी अदा करावी.
२) सीसीए कार्यालयाकडून दूरसंचार विभागाच्या हस्तक्षेपाशिवाय आयडीए वाढ आपोआप लागू करण्याची पूर्वीची पद्धत पुन्हा सुरू करावी.
पेन्शनधारकांनी न्याय हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, केंद्र सरकार आणि दूरसंचार विभागाने या प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *