सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या ‘इ-चलन’ कारवाईमुळे वाहतूकदार आणि बस मालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, याबाबत शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान तसेच पुणे आरटीओ कार्यालयावर आंदोलन करूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शासनाने बस मालकांना या त्रासातून तातडीने मुक्त करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी दिला.

पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २२) पिंपरी येथे झाली. या वेळी पिंपरी चिंचवड आरटीओचे पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, बोकी वेस्ट झोनचे उपाध्यक्ष किरण देसाई, पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, दशरथ पानमंद, भाऊसाहेब घोमल, स्वामी गुजर, राहुल मुळे, देवदत्त रावल यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

राजन जुनवणे यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञानावर आधारित युरो सिक्स वाहनांमुळे वाहनांच्या देखभाल खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत उत्पन्न वाढलेले नाही. तसेच या तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या ब्रेकडाऊनचे प्रमाणही वाढले असून, टायर आणि स्पेअर पार्टच्या वाढलेल्या किमतींचा व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. सरकारने या किमती कमी करून वाहतूकदार आणि बस चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

किरण देसाई यांनी व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी संघटित राहण्याची गरज व्यक्त केली.

युद्धजन्य परिस्थितीमुळे पुन्हा लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा संभाव्य संकटांना संघटना एकत्रितपणे सामोरे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकाश गवळी यांनी महाराष्ट्रातील संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली. एआरटीओ पवन नवादे यांनी आरटीओकडून वाहन चालक व मालकांसाठी विविध माहितीपर उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. प्रत्येक बस मालकाने वाहतूक नियम व कायद्यांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


या सभेसाठी टाटा मोटर्सने प्रमुख प्रायोजक म्हणून, तर अशोक लेलँड आणि व्ही. ई. कमर्शियल व्हेईकल यांनी सहप्रायोजक म्हणून सहकार्य केले. समारोप सत्रात संगीत कार्यक्रम तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्वागत दीपक कलापुरे यांनी, सूत्रसंचालन तेजस्विनी लोकरे यांनी तर आभार बाळासाहेब बोराटे यांनी मानले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *