
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील गोळे वस्ती झोपडपट्टीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील रहिवाशांना ७/१२ उताऱ्यावर नोंद देऊन विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने उरुळी कांचन ग्रामपंचायतीमध्ये सभा पार पडली.
यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत प्रशासन तसेच गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना निवेदन देत शासन निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

गट क्रमांक १३८७, मौजे उरुळी कांचन येथील गोळे वस्ती झोपडपट्टीतील रहिवासी गेली ३० ते ४० वर्षांपासून शासकीय भूखंडावर वास्तव्यास असून ते ताबेदार, वहिवाटदार व भोगवटादार असल्याचे विविध पुराव्यांद्वारे स्पष्ट झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जनहित याचिका क्रमांक ३९/२०१४ मधील निर्णयाचा दाखला देत सर्व झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागेवर करून त्यांच्या नावावर ७/१२ उताऱ्यावर नोंदी करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी शेखर शेलार म्हणाले, की येत्या आठ दिवसात ग्रामपंचायतमध्ये येथील स्थानिक रहिवाशांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत आणि इथून पुढची कारवाई ग्रामपंचायत प्रशासन करेल
तसेच महसूल व वन विभागाच्या २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पूर्वी अस्तित्वात असलेली निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून रहिवाशांना मालकी हक्क देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी संघटनेने केली.
यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या समितीद्वारे पंचनामे करून जमिनीचे मूल्यांकन व दंड आकारणीची कार्यवाही करण्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ अंतर्गत झोपड्यांची नोंद घेऊन नमुना क्रमांक ८अ उतारे द्यावेत, तसेच रमाई आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय योजना आणि सर्वांसाठी घरे योजनेचा लाभ पात्र कुटुंबांना मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
भूखंडाच्या अभावामुळे अनेक अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी घरकुल योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
गोळे वस्ती परिसरात रस्ते, गटारे, पथदिवे, पिण्याचे पाणी, समाजमंदिर आणि सार्वजनिक शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने दलित वस्ती सुधारणा कायद्यांतर्गत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
तसेच या वस्तीला “लोकशाहिर आण्णाभाऊ साठे नागरी” असे नाव देऊन राजपत्रित करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे नेते भगवानराव वैराट, काशिनाथ गायकवाड, आबासाहेब चव्हाण, सुरेखा भालेराव, दत्ता डाडर, संजय बंडे, गणेश लांडगे, दिगंबर मोहिते, शाहू भालेराव, बाळासाहेब शेलार, विनोद डोलारे, भारत डोलारे यांच्यासह राज्य, जिल्हा व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापुराव चौधरी उपसंपादक
