
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होदिगेरे येथे असलेल्या श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर अखेर भव्य मेघडंबरी उभारण्यात आली आहे. शिवभक्तांसाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण मानला जात असून, पुण्यातील मल्हार भक्त तथा इतिहासप्रेमी डॉ. गौरव भाऊ घोडे यांच्या पुढाकारातून हे महत्त्वपूर्ण कार्य पूर्णत्वास आले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याच्या पायाभरणीत मोलाचे योगदान दिले. मात्र होदिगेरे येथील त्यांच्या समाधीस्थळाची अवस्था अनेक वर्षांपासून दयनीय होती.

समाधीवर कोणतेही संरक्षणात्मक छत नसल्याने ऊन, वारा आणि पावसाचा थेट मारा होत होता. शिवभक्तांकडून वारंवार संवर्धनाची मागणी होत असतानाही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली जात होती.
ही बाब लक्षात घेऊन श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी पुढाकार घेत समाधीवर स्वखर्चाने भव्य मेघडंबरी उभारण्याचा संकल्प केला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामसाहेब रेपाळे यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
रविवार, २४ मे २०२६ रोजी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून तब्बल ४५० किलो वजनाची मजबूत आणि आकर्षक मेघडंबरी समाधीवर बसविण्यात आली. “वेडात मराठे वीर दौडले ७” या मावळ्यांच्या सहकार्याने हे संपूर्ण काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. प्रसाद चव्हाण, आकाश चव्हाण, काशिनाथ ओझरकर, महावीर पाटोळे, सुनील ढवळे आणि अविनाश कदम यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

विशेष म्हणजे, हे संपूर्ण काम अवघ्या एका रात्रीत गनिमी काव्याच्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले. कामादरम्यान तांत्रिक अडचणी, वाहतुकीच्या समस्या आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र छत्रपतींच्या प्रेरणेने आणि शिवभक्तांच्या जिद्दीमुळे हे कार्य यशस्वी झाल्याची भावना सहभागी मावळ्यांनी व्यक्त केली.
“छत्रपतींच्या इतिहासाचे आणि वारशाचे जतन करणे ही प्रत्येक शिवभक्ताची जबाबदारी आहे. आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे. श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या १८ वर्षांपासून ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा संवर्धनाची विविध कामे करण्यात येत आहेत,” असे डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी सांगितले.
बापुराव चौधरी उपसंपादक