सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची तब्बल 99.27 एकर जमीन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने अचानक ब्रेक लावला आहे. कोणतेही कारण न देता ‘पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रक्रिया स्थगित’ करण्याचे आदेश देण्यात आल्याने या बहुचर्चित व्यवहाराभोवती संशयाचे आणि चर्चांचे वादळ निर्माण झाले आहे.


सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव माधवी शिंदे यांनी 13 जुलै 2026 रोजी पणन संचालकांना पाठविलेल्या आदेशात, संबंधित जमीन खरेदीबाबत आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर पणन संचालनालयानेही त्याच दिवशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र पाठवून जमीन खरेदीसंदर्भातील सर्व पुढील प्रक्रिया तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

या पत्राची प्रत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांनाही पाठविण्यात आली असून, शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून 99.27 एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव चर्चेच्या केंद्रस्थानी होता. उपबाजार आवारासाठी हा व्यवहार महत्त्वाचा मानला जात असतानाच शासनाने कोणतेही स्पष्टीकरण न देता प्रक्रिया स्थगित केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या व्यवहारात नेमके काय घडले, अहवालात असे काय नमूद झाले आणि शासनाने इतका कठोर निर्णय का घेतला, याबाबत आता विविध स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या भविष्यातील नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता राज्य सरकारच्या पुढील आदेशाकडे कृषी क्षेत्र, बाजार समिती, सहकार क्षेत्र आणि थेऊर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *