
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : बकरी ईद सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या वतीने मंगळवारी (दि. 27) सायंकाळी गावात भव्य रूट मार्च काढण्यात आला. सायंकाळी ६.१५ ते ७.२५ या वेळेत हा रूट मार्च पार पडला.
पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.

रूट मार्चची सुरुवात उरुळी कांचन पोलिस स्टेशन येथून करण्यात आली. त्यानंतर आश्रम रोड, निसर्गोपचार आश्रम, ग्रामपंचायत चौक, जामा मशीद, सटवाई चौक, महात्मा गांधी विद्यालय, एम. जी. रोड, तळवाडी चौक मार्गे पुन्हा पोलिस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली. गावातील प्रमुख रस्ते आणि संवेदनशील भागांमधून पोलिसांनी पायी फेरी मारत नागरिकांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले.
या रूट मार्चमध्ये पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलिस अंमलदार तसेच १५ होमगार्ड सहभागी झाले होते. सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे लाठी व हेल्मेटसह सज्ज अवस्थेत सहभागी झाल्याने बंदोबस्ताची ताकद स्पष्टपणे दिसून आली. रूट मार्चदरम्यान पोलिसांनी विविध चौकांमध्ये थांबून नागरिकांशी संवाद साधत सण उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच समाजकंटकांवर वचक राहावा, यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा रूट मार्च आयोजित केला होता.
गावातील नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी रूट मार्च पाहण्यासाठी गर्दी केली होती.

दरम्यान, सणाच्या काळात अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद घटना अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याकडून करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बापुराव चौधरी उपसंपादक