सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पुणे शहरात विषारी दारू सेवनामुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज पर्वती पायथा परिसरात बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका गुत्त्यासमोर निषेध व्यक्त करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
“दारू माफियांवर तात्काळ कारवाई करा”, “निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनकर्त्यांनी विषारी दारू विक्रीस जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले.


नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर दारू व्यवसायावर कठोर कारवाई करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पुणे पोलिस प्रशासन आणि राज्य शासनाने विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर दारूविक्रीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगच्या वतीने करण्यात आली.

हे आंदोलन श्रीमती संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी शोभा पणीकर, सोनिया ओव्हाळ, भारती लोंढे, निकिता भालेराव, माया वाघमारे, सिंधू धोत्रे, सुनिता भालेराव, स्वाती शिंदे, अंजना नागटिळक, सखुबाई कांबळे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *