सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : थेऊर, नायगाव व हिंगणगाव (एजी) फिडरअंतर्गत येणाऱ्या १२ गावांना सोमवारपासून पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आज सकाळी १० वाजल्यापासून थेऊर एजी, नायगाव एजी आणि हिंगणगाव एजी या तीन फिडरवरील थेऊर, कोलवडी-साष्टे, नायगाव, पेठगाव, कोरेगावमुळ, भवरापूर, अष्टापूर, खामगाव टेक, टिळेकरवाडी, शिरसवाडी, बिवरी आणि नायगाव या गावांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रात्री शेतात जाऊन शेतीपंप सुरू करणे धोकादायक ठरत होते. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून दिवसा वीजपुरवठ्याची मागणी जोर धरत होती.

या मागणीची दखल घेत महावितरण प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत आजपासून तिन्ही फिडरवर दिवसा वीजपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंप चालविणे शक्य होणार असून शेतीकामांनाही गती मिळणार आहे.


या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार ज्ञानेश्वर कटके, सभापती युवराज काकडे आणि महावितरण प्रशासनाचे आभार मानले आहेत.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *