
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : “साहित्य सम्राट पुणे संस्थेचा चौदा वर्षांचा प्रवास हा साहित्यिकांच्या सहवासाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास आहे. बागेतील गवतापासून स्मशानभूमीपर्यंत, दवाखाना, विद्यापीठ, महापालिका, शाळा-महाविद्यालये अशा विविध स्तरांवर साहित्य आणि कलेची उपयुक्तता अधोरेखित करणारी ही चळवळ आहे. त्यामुळे कोणत्याही पुढारी नेत्यापेक्षा कवी-कलावंत अधिक वंदनीय वाटतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी केले.

साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित २२५ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी स्व. विठ्ठल तुपे-पाटील नाट्यगृह, हडपसर येथे या संमेलनाचे आयोजन केले होते.

या वेळी कवयित्री ललिता सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते, सूर्यकांत वैद्य, चित्रपट निर्माते संजय सिंगलवार, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. सुनील लोखंडे, डी.एस.एस.चे दादासाहेब सोनवणे, उद्योजक संदीप रणदिवे, गझलकार मसूद पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. संगीतकार शिवराज साने यांच्यासह उपस्थित कवींचा संस्थेच्या आजीव सभासदांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या पूजनाने झाली. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सिताराम नरके यांनी केले, तर वृक्षआरती लक्ष्मण शिंदे यांनी सादर केली. नानाभाऊ माळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संमेलनाचा उद्देश संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केला.

पुढे बोलताना सबनीस म्हणाले, “या संस्थेत प्रत्येक सामान्य माणूस कवी-कलावंत सम्राट झाला आहे. शिवाजी महाराजांपासून अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत सर्व महापुरुषांच्या विचारांची बेरीज करून त्यांचे वैचारिक ऐक्य जपणे, हेच खरे साहित्यिकाचे कार्य आहे. साहित्य आणि कविता कोणत्याही एका धर्माची किंवा जातीची नसून ती मानवतेचा संदेश देणारी असावी.” विनोद अष्टुळ यांच्या विविध उपक्रमांतून ही सर्वसमावेशक भूमिका प्रकर्षाने दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी साहित्य सम्राट पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. पी. डी. कदम यांच्या ‘भिकाऱ्याचे जीवन’ व ‘तिन्हीसांजेला’, सुभाष ढगे यांच्या ‘उत्साही आयुष्य’ आणि सिताराम नरके यांच्या ‘नात्यांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले. विविध कवी-कवयित्रींनी आपल्या बहारदार काव्यरचना सादर करून रसिकांची दाद मिळविली.

कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी अर्चना अष्टुळ, सुषमा रणदिवे, कन्हैया साबळे, बाळासाहेब केमकर, संजय ओसवाल आणि ओंकार अष्टुळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उफाडे, तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन जगदीप वनशिव यांनी केले. आभार प्रदर्शन कवी संमेलनाचे अध्यक्ष म. भा. चव्हाण यांनी केले.
बापुराव चौधरी उपसंपादक