सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेंडकर (वय २८, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे) याला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी (ता. २२) सासवड येथून अटक केली.

दिगंबर शेंडकर याच्याविरुद्ध शिरूर, सासवड आणि जेजुरी पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो अनेक महिन्यांपासून फरार होता. वेशांतर करून आणि वारंवार ठिकाणे बदलत राहत असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी बेलसर (ता. पुरंदर) येथील सूरज अनिल जाधव यांना ट्रान्सफॉर्मर बंद न केल्याच्या कारणावरून शेंडकर व त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तो फरार झाला होता.

त्यानंतर ९ मार्च २०२६ रोजी सोनोरी येथील हॉटेल व्यावसायिक राहुल सुभाष काळे यांच्या हॉटेलमध्ये घुसून शेंडकर व त्याच्या साथीदारांनी मालक व कामगारांना दमदाटी करत मारहाण केली आणि काउंटरमधील ३२ हजार रुपये जबरदस्तीने लुटले. यापूर्वीही काळे यांच्याकडून अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

याच महिन्यात १९ मार्च रोजी मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे क्रिकेट मैदानावरील बॅनरवर फोटो लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात अमोल आनंदा चौगुले यांच्यावर शेंडकर व त्याच्या सहा साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार केला होता. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिगंबर शेंडकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध राजगड, जेजुरी, सासवड आणि शिरूर पोलिस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, आर्म ॲक्ट तसेच मोक्का कायद्यान्वये एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

शेंडकर हा अवैध अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याची माहिती पुणे ग्रामीण एटीएसला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. एटीएसच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून आणि वेशांतर करून सासवड येथून त्याला ताब्यात घेतले.

फरार राहण्यासाठी त्याला कोणी मदत केली, तसेच त्याचे अन्य कोणाशी संबंध होते, याचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल गव्हाणे तसेच पोलिस अंमलदार मोसीन शेख आणि ओंकार शिंदे यांच्या पथकाने केली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *