सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : न-हे पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने नवले पुलाखाली कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसवर छापा टाकून तब्बल २२ लाख ९१ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न-हे पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार देवा चव्हाण यांना ट्रॅव्हल्स बसमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे आणि तपास पथकाने नवले पुलाखाली सापळा रचला.

तपासणीदरम्यान ट्रॅव्हल्स बसचा चालक हबास मुबारक खान (वय ३४, रा. बाडमेर, राजस्थान) याच्या ताब्यातून प्रतिबंधित विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, आरएमडी पान मसाला, तुळशी तंबाखू आणि गोवा गुटखा असा ५ लाख ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच माल स्वीकारण्यासाठी आलेल्या सोहेल अस्लम मुलाणी (वय २२, रा. गंजपेठ, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

पुढील चौकशीत सोहेल मुलाणी याने केदारीनगर परिसरातील गोदामात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून १७ लाख ७३४ रुपयांचा अतिरिक्त मुद्देमाल जप्त केला. अशाप्रकारे एकूण २२ लाख ९१ हजार ५३४ रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आला.

चौकशीत हा माल अहमदाबाद येथून खरेदी केल्याची कबुली आरोपींनी दिली. याप्रकरणी न-हे पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५), सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपआयुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, किरण लिटे तसेच पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, सुमित जगझाप, राजू तोरे, नितीन वाघमारे आणि निलेश भोरडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *