सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत थेऊरफाटा येथे एकदिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १३८ नव-कुक्कुटपालक शेतकरी उद्योजकांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत विविध कुक्कुटपालन योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित शिबिरात शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायाची शास्त्रोक्त माहिती, संगोपन, व्यवस्थापन, खाद्य नियोजन, रोग प्रतिबंधक उपाययोजना तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्याताई गायकवाड, सदस्य अमोल टेकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जी. बी. चौधरी, थेऊरचे माजी उपसरपंच भरत कुंजीर, स्वप्नील कुंजीर, रूपचंद बोडके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार कटके यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाचा स्वीकार करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन केले. ग्रामीण भागात पशुधन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सभापती युवराज काकडे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *