सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराचे स्वतंत्र सांस्कृतिक धोरण आजवर निश्चित झालेले नाही. हे धोरण निश्चित करण्याचा महापालिकेचा मानस असून त्यासाठी कलाकारांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित, अलविरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘बालगंधर्व महोत्सवा’त मध्यरात्री महापौरांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

यावेळी गायक सुदेश भोसले, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी, अलविरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे, तृप्ती देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर नागपुरे यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रस्तावित पुनर्विकासाबाबतही भूमिका स्पष्ट केली.

बालगंधर्व रंगमंदिर ही कलाकार आणि रसिकांच्या भावविश्वाशी निगडित ऐतिहासिक वास्तू असून पुनर्विकासाच्या नावाखाली ती पाडण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. कलाकार आणि रसिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे हाच पुनर्विकासाचा उद्देश असून, त्यासंदर्भातील सर्व निर्णय कलाकारांना विश्वासात घेऊनच घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या सर्व सांस्कृतिक सभागृहांची नोंदणी पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच, बालगंधर्व महोत्सवासाठी दरवर्षी तीन दिवस बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा कायमस्वरूपी राखीव ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी मेघराज राजेभोसले यांनी सलग १८ वर्षे कलाकारांच्या पुढाकारातून बालगंधर्व महोत्सव साजरा होत असल्याची माहिती दिली. या महोत्सवात संगीत रजनी, लावणी, एकपात्री प्रयोग, जादूचे प्रयोग, व्याख्याने आणि परिसंवाद असे विविध कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आयोजित केले जातात.

मात्र, महोत्सवाच्या काळात रंगमंदिराच्या तारखा उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने वर्धापनदिनानिमित्त तीन दिवस कायमस्वरूपी राखीव ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, कलाकारांच्या स्वखर्चातून आयोजित होणाऱ्या या महोत्सवाला महापालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळावे आणि पुनर्विकासाच्या प्रक्रियेत मूळ वास्तू अबाधित ठेवून कलाकारांना विश्वासात घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. यापैकी बहुतेक मागण्या महापौरांनी तत्काळ मान्य केल्या.

चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी यांनी, मध्यरात्री उपस्थित राहून बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या महापौरांनी कलाकार आणि स्त्रीशक्तीचा सन्मान केला असून, ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग चौधरी यांनी, तर आभारप्रदर्शन अनिल गुंजाळ यांनी केले.

पोकळ आश्वासने देण्यावर माझा विश्वास नाही’
कार्यक्रमात कलाकारांच्या वतीने करण्यात आलेल्या बहुतांश मागण्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी मान्य केल्या. मात्र, बालगंधर्व महोत्सवासाठी महापालिकेकडून निधी देण्याबाबत त्यांनी तत्काळ आश्वासन दिले नाही. उपस्थितांनी किमान सकारात्मक भूमिका जाहीर करण्याची विनंती केल्यानंतर नागपुरे म्हणाल्या, “मी राजकारणात असले तरी पोकळ आश्वासने देण्यावर माझा विश्वास नाही. कदाचित त्यामुळेच मी बिनविरोध महापौरपदी निवडून आले आहे. महोत्सवाला निधी देण्याबाबत आवश्यक माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही निश्चित करण्यात येईल.”

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *