
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पिंपरी : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या जन्म, कर्म व निर्वाणभूमी असलेल्या देहू, आळंदी, टाळगाव चिखली, तळवडे या पंचक्रोशीला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी केली. देहू ते आळंदी या १६ किलोमीटरच्या पालखी मार्गास ‘संतभूमी’चा अधिकृत दर्जा देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अभय टिळक म्हणाले, उत्तराखंड सरकारने ‘देवभूमी’ म्हणून काही भागांना विशेष संरक्षण देत तेथील पावित्र्य जपत विकासकामे केली आहेत. त्याच धर्तीवर देहू-आळंदी परिसरालाही ‘संतभूमी’ म्हणून घोषित करून सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक सुरक्षितता आणि नियोजनबद्ध विकासासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले की, सोमवारपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी ‘संतभूमी’चा विषय सभागृहात मांडावा. आगामी पंढरपूर यात्रेपूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना निवेदन देऊन या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासोबतच वारकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. स्वाती मुळे म्हणाल्या, गेल्या पंधरा वर्षांत या परिसरात झपाट्याने शहरीकरण झाले असून वाहतुकीचा ताणही वाढला आहे. इंद्रायणी नदीत अनेक ठिकाणी प्रदूषित व अस्वच्छ पाणी सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढत आहे. भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. हा परिसर ‘संतभूमी’ म्हणून घोषित झाल्यास पर्यावरण संवर्धनासह विविध नागरी समस्या सोडविण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बापुराव चौधरी उपसंपादक
