सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था इंग्लिश मीडियम स्कूल, लोणी काळभोर येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि मोबाईलच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

रविवारी (ता. २९) सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत झालेल्या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहून सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक मुंडे, शाळेच्या प्राचार्या शेवाळे मॅडम, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.

यानंतर अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल येथून सुरू झालेली प्रभात फेरी श्री दत्त मंदिर चौक, खोकलाई देवी चौक, बिग बाजार चौक, श्री गणेश चौक, मारुती मंदिर चौक, सावता माळी चौक, रामदरा रोड, लोणी काळभोर पोलिस स्टेशन व सरकारी हॉस्पिटल मार्गे पुन्हा शाळेसमोर येऊन समाप्त झाली.

या प्रभात फेरीत पोलिस अधिकारी व अंमलदारांसह शाळेतील सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी घोषणा देत समाजात नशामुक्तीचा संदेश दिला.

यावेळी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या वतीने नागरिकांनी, विशेषतः युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून सुरक्षित डिजिटल वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *