
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह निवारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र – पुणे विभागीय केंद्र’ चे उद्घाटन शनिवारी पिंपळे गुरव येथील परमपूज्य पितामह भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात महासंघाचे अध्यक्ष अरुणदादा बोरोले यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला समाजातील कार्यकर्ते, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात महासंघाचे उपाध्यक्ष तथा लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागरचे अध्यक्ष विकास वारके यांनी समुपदेशन समितीच्या कार्याची माहिती दिली. समितीत कायदेतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, प्रशिक्षित समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असल्याने ती सर्वसमावेशक व संतुलित असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष अरुणदादा बोरोले यांनी समुपदेशन केंद्राच्या कार्याचा शुभारंभ जाहीर करताना समाजात वाढत असलेल्या कौटुंबिक व सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर अशा केंद्रांची आवश्यकता अधोरेखित केली. योग्य समुपदेशनाद्वारे अनेक घटस्फोट टाळता येऊ शकतात, कुटुंब व्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते आणि समाजाची एकजूट वाढू शकते, असे ते म्हणाले. प्रत्येक समाजबांधवाने या उपक्रमाचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून कार्य करत केंद्राची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी समाजातील एकोप्याबरोबरच संकटग्रस्त कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदतीची भावना जोपासण्याची गरज व्यक्त केली. समुपदेशनातून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास समाज अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी परस्पर संवाद, समन्वय आणि संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. समुपदेशन करताना उपदेश करण्याऐवजी संबंधितांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येकाने या केंद्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून गरजूंना समुपदेशनाचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. दिनेश नेहेते यांनी वाढत्या स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद केले. पती-पत्नीमध्ये स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना आवश्यक असून मानसिक बळासाठी एकत्रित कुटुंब व्यवस्था महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲड. महेश ढाके यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. रमेश वारके यांनी समाजासाठी अशा केंद्रांची आज नितांत गरज असल्याचे सांगत आपले योगदान देण्याची तयारी व्यक्त केली. कृष्णाजी खडसे यांनी विवाहपूर्व, विवाहोत्तर समुपदेशन, कौटुंबिक कलह, किशोरवयीन मुलांमधील नैराश्य, वयोवृद्धांच्या समस्या आदी विषयांवर समितीमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गरज पडल्यास संबंधितांच्या घरी जाऊनही समुपदेशन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

या समुपदेशन समितीत निवृत्त न्यायाधीश संजय पाटील, डॉ. दिनेश नेहेते, ॲड. महेश ढाके, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल जवळे, रमेश वारके, समुपदेशिका प्रतिभाताई राणे, ॲड. पायल चौधरी, समुपदेशिका विभावरी इंगळे, समुपदेशिका किरणताई पाचपांडे, विजयाताई जंगले आणि कृष्णाजी खडसे यांचा समावेश असून ते समाजबांधवांना विविध सामाजिक व कौटुंबिक प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. पायल चौधरी यांनी केले, तर दिलीप चौधरी यांनी आभार मानले.
बापुराव चौधरी उपसंपादक
