
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : कोरेगावमूळ येथील नदीकाठी कुरणाशेजारी असलेल्या कानकाटे पाटील यांच्या वीटभट्टी परिसरात गुरुवारी (ता . 2) पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक मेंढी व एक गाय ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने या भागात पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीकाठच्या परिसरात असलेल्या कुरणाजवळील वीटभट्टी परिसरात पहाटेच्या वेळी बिबट्याने जनावरांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक मेंढी व एक गाय जागीच ठार झाली. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या हालचालींची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

परिसरात नदीकाठ, झाडी तसेच मोकळी कुरणे असल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जनावरे उघड्यावर न ठेवता सुरक्षित गोठ्यात बांधावीत, तसेच एकट्याने शेत, नदीकाठ किंवा निर्जन भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः लहान मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी रात्री अथवा पहाटे बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकमेकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, कोरेगावमूळच्या पोलिस पाटील वर्षा सचिन कड यांनी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देत, “कोरेगावमूळ तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या मुक्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. बिबट्याचा वावर आढळल्यास तत्काळ वनविभाग अथवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी,” असे आवाहन केले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
