
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील नियोजन, सुरक्षा आणि विविध विभागांमधील समन्वय यासाठी उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या वतीने उरुळी कांचन, सोरतापवाडी आणि नायगाव या तीन ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक शुक्रवारी (ता. ३) आयोजित करण्यात आली. बैठकीत पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस तीनही ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. पालखी मार्गावरील गर्दीचे नियोजन, भाविकांच्या सुविधांची उपलब्धता आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत विविध सूचना व सूचना स्वीकारण्यात आल्या.
बैठकीत पालखी सोहळ्यादरम्यान प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, भाविकांसाठी मंडपांची उभारणी, दर्शनबारीची योग्य व्यवस्था, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा, वाहतूक नियंत्रण तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालखी सोहळा हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा सोहळा असल्याने सर्व संबंधितांनी जबाबदारीची जाणीव ठेवून नियोजनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, तसेच कोणतीही अडचण उद्भवल्यास तत्काळ प्रशासन आणि पोलिस यंत्रणेशी संपर्क साधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून पालखी सोहळा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भाविकांसाठी सोयीस्कर वातावरणात पार पडावा, हा बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात आवश्यकतेनुसार आणखी समन्वय बैठका घेऊन नियोजनाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
बापुराव चौधरी उपसंपादक
