
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त हवेली पंचायत समितीच्या वतीने तालुकाभर विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत मौजे आळंदी म्हातोबा येथे ‘अजित वनराई’ उपक्रमात ५०० नारळाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये व परिसरात प्रतिमापूजन आणि ‘अजितवृक्ष’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या हस्ते झाले. सुरेशराव घुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज हिरामण काकडे, उपसभापती विद्या दत्तात्रय गायकवाड, गटविकास अधिकारी शेखरजी शेलार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, जिल्हा परिषद सदस्य कोमलताई संदेश आव्हाळे, सुरेखाताई रमेशबापू हरगुडे, शितलताई सुजित कांबळे, पंचायत समिती सदस्य कृषिराज दत्तात्रय चौधरी, कोमलताई गणेश कांबळे, सुषमाताई संतोष मुरकुटे, नंदू पाटील काळभोर, गुलाब चौधरी, दिलीप गाडे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आळंदी म्हातोबाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री म्हातोबा-जोगेश्वरी कृती समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणासारखे पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
भविष्यातही हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित परिसर निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

हवेली तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिमापूजन व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश संपूर्ण तालुक्याला देण्यात आल्याचे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.
बापुराव चौधरी उपसंपादक
