
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जाज्वल्य विचारांना, साहित्यसंपदेला आणि श्रमिक-कष्टकरी समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला अभिवादन करण्यासाठी उरुळी कांचन येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी, साहित्यप्रेम आणि अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त झाला.

कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनप्रवासाची, त्यांच्या साहित्याची आणि समाजपरिवर्तनासाठी केलेल्या कार्याची उजळणी केली.
युवराज कांचन यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजातील उपेक्षित, वंचित आणि श्रमिक वर्गाच्या वेदनांना वाचा फोडणारे असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचे जतन करण्याचे आवाहन केले. संतोष कांचन यांनीही मनोगत व्यक्त करत अण्णाभाऊंच्या कार्यातून समाजाला मिळालेली प्रेरणा अधोरेखित केली.

यावेळी सारिका लोणारी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा विविध अंगांनी वेध घेतला. त्यांच्या शिक्षणाविषयीच्या विचारांची मांडणी, समृद्ध साहित्यसंपदा, संघर्षमय जीवनप्रवास तसेच श्रमिक आणि कष्टकरी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती त्यांनी प्रभावी शब्दांत उपस्थितांसमोर मांडली. त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये अण्णाभाऊंच्या विचारांबद्दल नव्याने प्रेरणा निर्माण झाली.
या कार्यक्रमाला उरुळी कांचनमधील समस्त ज्येष्ठ, सन्माननीय मान्यवर, विशेषतः के. डी. कांचन, गावातील सर्व विद्यमान व माजी सरपंच, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेते, तसेच लोणारी परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांप्रती असलेली कृतज्ञता प्रकर्षाने जाणवत होती. उपस्थितांनी त्यांच्या साहित्याचे वाचन, विचारांचे जतन आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन किशोर लोणारी आणि सारिका लोणारी यांनी केले. त्यांच्या परिश्रमांमुळे हा सोहळा शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा दीप समाजात सतत प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प करत भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
बापुराव चौधरी उपसंपादक
