सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्ठा, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श निर्माण करणारे पै. अतुल (भैय्या) कुंजीर यांचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजित 12व्या वार्षिक महासभेत विशेष सन्मान करण्यात आला. मुंबईतील अंधेरी येथील गुजराती भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांना “आत्मसन्मान गौरव पुरस्कार 2026” प्रदान करण्यात आला.

समाजातील प्रश्नांना वाचा फोडत, सामान्य नागरिकांच्या समस्या मांडत आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. एस. शेख आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या हस्ते पै. अतुल (भैय्या) कुंजीर यांचा गौरव करण्यात आला.

संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कुंजीर यांनी पत्रकारितेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि जनहिताचे विषय प्रभावीपणे मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीमधून सामाजिक जाणीव, लोकहित आणि सकारात्मक बदलाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे.

या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून हा सन्मान केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून समाजहितासाठी काम करणाऱ्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

पै. अतुल (भैय्या) कुंजीर हे सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असून राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत या संस्थेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिरूर-हवेली विधानसभा युवक अध्यक्षपदाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत.

पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेली वेगळी ओळख या पुरस्कारामुळे अधोरेखित झाली आहे. भविष्यातही समाजातील विविध प्रश्नांसाठी त्यांची लेखणी आणि सामाजिक योगदान अशीच प्रभावीपणे सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *