
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी आणि अन्य निवृत्ती लाभांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली ३ ऑगस्ट २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाच्या २३ मार्च २०१७ रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता वित्त विभागातील अधिकाऱ्यांकडून पेन्शनबाबत अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २३ मार्च २०१७ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली होती. या निर्णयानंतर प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार लाभ मिळत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

मजीप्राच्या विविध पाणीपुरवठा योजना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित झाल्याने तसेच ग्रामीण भागातील काही कामे जिल्हा परिषदेकडे गेल्याने प्राधिकरणाच्या आस्थापना खर्चावर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नासाठी विविध कर्मचारी संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला. महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघ तसेच मजीप्रा संघर्ष कृती समितीने २०१४ पासून या मागणीसाठी आंदोलन केले होते.

दरम्यान, एका प्रकरणात कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून जुन्या पत्राच्या आधारे मजीप्रातील कर्मचाऱ्यांना विशिष्ट पेन्शन नियम लागू नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मजीप्राला पत्र पाठवून याबाबत माहिती दिली. मात्र या पत्रात निवृत्ती वेतन बंद करण्याचा कोणताही उल्लेख नसतानाही मार्च २०२६ पासून काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन व निवृत्ती लाभ रोखण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे.

या निर्णयामुळे मजीप्रातील सुमारे १२ हजार ५०० पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोष निर्माण झाल्याचे समितीने म्हटले आहे. शासन निर्णय व मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा विचार न करता पेन्शनबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच रखडलेले निवृत्ती वेतन तातडीने सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असून आंदोलनादरम्यान राज्यातील मजीप्राच्या विविध कार्यालयांसमोरही कर्मचारी धरणे आंदोलन करणार असल्याचे संघर्ष कृती समितीने सांगितले.
बापुराव चौधरी उपसंपादक