सुवर्णा कांचन मुख्य संपादक

मुंबई : लोककलावंत सांस्कृतिक मंच, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोककला महोत्सव २०२६’ मध्ये गेल्या २५ वर्षांपासून लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे गायक, कवी व संगीतकार शिवराज साने यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात २७ ऑगस्ट रोजी हा महोत्सव उत्साहात पार पडला.

शिवराज साने यांनी गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम राबविले आहेत. महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि जातीयता निर्मूलन अशा विविध सामाजिक विषयांवर गीतगायनाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केले आहे. या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाची दखल घेत त्यांचा महोत्सवात गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, ज्येष्ठ विचारवंत व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रा. बी. के. डोंगरगावकर, प्रसिद्ध कवी चंदनशिवे, गायक-संगीतकार विश्वजीत शिंदे, गायक राहुल शिंदे तसेच प्रसिद्ध पोवाडा गायक राजा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद कांबळे यांनी केले. यावेळी विष्णू शिंदे लिखित ‘त्रिरत्न’, ‘नील नयनी’ आणि ‘बहुरंग’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही पार पडला. तसेच महापुरुषांच्या विचारांवर आधारित गीतगायनाचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.
लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून लोककलेला सामाजिक प्रबोधनाची जोड देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक गायक, कवी व संगीतकार विष्णू शिंदे होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *