
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सौजन्याने आणि उदय काळभोर यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी व फूट पल्स सेंटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास १५० नागरिकांनी या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हे केंद्र मोठा आधार ठरत आहे.

गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, पायांमध्ये होणारा त्रास, शरीराच्या हालचालींमध्ये अडथळा तसेच वयोमानानुसार निर्माण होणाऱ्या विविध शारीरिक समस्यांवर आवश्यक थेरपीची सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असल्याने आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा सहज लाभ घेता येत आहे.
वयोमानानुसार अनेक ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी, कंबरदुखी व पायांच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. नियमित फिजिओथेरपीसाठी शहरातील केंद्रांमध्ये जावे लागत असल्याने प्रवासाचा वेळ आणि उपचाराचा खर्च यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या. मात्र, गावातच मोफत फिजिओथेरपी व फूट पल्स सेंटर उपलब्ध झाल्यामुळे ही गैरसोय दूर झाली आहे.

नियमित थेरपीमुळे अनेक नागरिकांना शारीरिक हालचाली सुलभ होण्यास तसेच दैनंदिन जीवनातील त्रास कमी होण्यास मदत होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गावाच्या विकासात केवळ रस्ते, पाणी, वीज यांसारख्या भौतिक सुविधांबरोबरच नागरिकांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे, या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत सदस्या राजश्री काळभोर, बिना काळभोर आणि मंदाकिनी नामुगडे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. नागरिकांना या सुविधेची माहिती मिळावी, जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि केंद्राची सेवा प्रभावीपणे सुरू राहावी, यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

२१ ऑगस्टपर्यंत मोफत सेवा
नागरिकांसाठी ही विशेष मोफत फिजिओथेरपी व फूट पल्स सेवा १० ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कदमवाकवस्ती तसेच परिसरातील गरजू नागरिकांनी या कालावधीत मोफत आरोग्य सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम ‘निरोगी ग्रामस्थ, सक्षम गाव’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा असून, कदमवाकवस्तीच्या सामाजिक व आरोग्यविषयक विकासासाठी सकारात्मक पाऊल ठरत आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
