
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने वनविभागाच्या वतीने पुणे शहरातील मौजे धानोरी (ता. हवेली) येथील राखीव वनक्षेत्र, सर्व्हे क्रमांक ६९ मधील अटल घन वृक्षलागवड (मियावाकी) रोपवन क्षेत्रात स्थानिक प्रजातींच्या वृक्षलागवडीचा उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमाला विद्यमान आमदार बाप्पूसाहेब पठारे तसेच परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी पुणे वनवृत्ताचे वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, विभागीय वनाधिकारी (दक्षता) अमोल थोरात आणि सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवडीची अंमलबजावणी करण्यात आली.

उपक्रमाचे नियोजन व समन्वय वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी केले. तसेच वनपाल शितल खंडके, वनरक्षक एस. बी. गायकवाड, प्रिया आकेन आणि वनसेवक लक्ष्मण टिंगरे यांच्यासह अधिनस्त वनपाल व वनरक्षकांच्या पथकाने वृक्षलागवडीचे काम प्रभावीपणे पूर्ण केले.

मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येत असलेल्या या रोपवनात स्थानिक हवामानाशी सुसंगत व पर्यावरणपूरक अशा स्थानिक प्रजातींची लागवड करण्यात आली. या पद्धतीमुळे अल्प जागेत दाट जंगल निर्माण होण्यास मदत होत असून जैवविविधता वाढण्याबरोबरच कार्बन शोषण, मृदसंवर्धन आणि पक्षी-वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होण्यासही हातभार लागणार आहे.

वनविभागाच्या या उपक्रमामुळे धानोरी परिसरातील हरित क्षेत्रात भर पडणार असून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यासही मदत होणार आहे. आगामी काळात अशा वृक्षलागवड मोहिमा सातत्याने राबवून पुणे शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्याचा वनविभागाचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बापुराव चौधरी उपसंपादक
