
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : हवेली तालुक्यातील हिंगणगाव-खामगावटेक येथील मुळा-मुठा नदीवरील सुरू असलेल्या पुलाच्या उंचीबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जुलै २०२६ मध्ये आलेल्या पुरामुळे पुलाचे गर्डर स्लीप झाल्याने पुलाची उंची अपुरी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुलाची उंची सात ते आठ फूट वाढविण्याची मागणी हिंगणगाव व खामगावटेक ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आली आहे.

८ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन मुख्य अभियंता भालकर, यांत्रिकी विभागाचे अधिकारी तसेच माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत हिंगणगाव-खामगावटेक ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, मान्यवर व पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांसमवेत पुलाच्या जागेची पाहणी करण्यात आली होती.

त्या वेळी ग्रामस्थांनी पावसाळ्यात नेहमी येणाऱ्या पुराची पातळी स्मशानभूमीच्या वरच्या टॉपपर्यंत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार सर्वेक्षण करून पुलाचे डिझाईन तयार करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात पुलाची उंची दाखविलेल्या पुराच्या पातळीपेक्षा सुमारे पाच फूट कमी झाल्याचे जुलै २०२६ मधील पुरामुळे स्पष्ट झाले. या कमी उंचीमुळेच पुलाचे गर्डर स्लीप झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगणगाव व खामगावटेक या दोन्ही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून पुलाची उंची सात ते आठ फूट वाढविण्याची लेखी मागणी केली आहे. दोन्ही गावच्या आजी-माजी सरपंचांसह शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता श्रीमती स्नेहा हब्बू, पीएमआरडीए यांची भेट घेऊन निवेदन दिले.

उंची वाढविण्याचा निर्णय होईपर्यंत पुलाचे काम थांबवावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय कळविण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता हब्बू यांनी शिष्टमंडळाला दिली.

या वेळी माजी सरपंच अंकुश कोतवाल, माजी सरपंच प्रेमजी थोरात, बाळासाहेब थोरात, माजी सरपंच सत्यवान गायकवाड, व्हाईस चेअरमन बाबा दिनकर थोरात, बाळू थोरात यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
बापुराव चौधरी उपसंपादक
