
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : हडपसर ते वरवंड तसेच वरवंड ते हडपसर या पुणे-सोलापूर महामार्गावरील PMPML बससेवेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट घेताना मोठ्या गोंधळाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रवासी ज्या गावातील अथवा बसथांब्यावर उतरतात, त्या ठिकाणचे नाव तिकीटावर न येता त्याऐवजी अन्य स्टॉप अथवा हॉटेल, मंगल कार्यालयाच्या नावाने तिकीट देण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

चौफुला येथून लोणी काळभोर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना ‘रामबाग शेवाळेवाडी’ या नावाने तिकीट देण्यात येते. तसेच उरुळी कांचन येथून लोणी काळभोर येथे येणाऱ्या प्रवाशांना ‘रामा कृषी कारखाना’ या नावाने तिकीट दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात प्रवासी लोणी काळभोर येथील बसथांब्यावर उतरतात; मात्र तिकीटावर लोणी काळभोर या गावाचे नाव नसल्याने प्रवाशांना तिकीट घेताना वाहकाकडे वारंवार चौकशी करावी लागत आहे.

पुणे जिल्ह्यातील पंचक्रोशीतील मोठे गाव म्हणून लोणी काळभोरची ओळख असतानाही PMPMLच्या तिकीट यंत्रणेत गावाचे नावच नसल्याने प्रशासनाला गावाच्या नावाचा विसर पडला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

चौफुला ते हडपसरदरम्यान सुमारे १० ते १२ गावांचे बसथांबे आहेत. मात्र, यातील काही ठिकाणांची नावे गावांच्या नावाऐवजी मंगल कार्यालये, हॉटेल किंवा इतर व्यावसायिक आस्थापनांच्या नावाने तिकीट मशीनमध्ये नोंदविण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे PMPMLच्या तिकीट यंत्रणेत स्थानिक गावांची नावे प्राधान्याने असावीत, अशी मागणी होत आहे.

सोरतापवाडी, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदमवाक वस्ती यांसारख्या महत्त्वाच्या गावांची नावे तिकीट प्रणालीमध्ये योग्य पद्धतीने उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
गावांच्या नावांऐवजी व्यावसायिक आस्थापनांची नावे वापरली जात असल्याने त्यातून संबंधित आस्थापनांची अप्रत्यक्ष जाहिरात करण्याचा प्रकार होत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान, प्रवासी ज्या बसथांब्यावर उतरतो, त्याच बसथांब्याचे किंवा संबंधित गावाचे नाव तिकीटावर देण्यात यावे, तसेच लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी आणि सोरतापवाडी या गावांची नावे PMPMLच्या तिकीट यंत्रणेत समाविष्ट करावीत, अशी मागणी करणारे निवेदन संबंधित चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (CTM) यांच्याकडे देण्यात आले आहे.
गावांची ओळख कायम ठेवण्याची मागणी
PMPML ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून, तिकीट प्रणालीमध्ये स्थानिक गावांची अधिकृत नावे वापरणे आवश्यक आहे. प्रवाशांना कोणत्या ठिकाणाचे तिकीट घेतले आहे, हे सहज समजावे आणि स्थानिक गावांची ओळखही कायम राहावी, यासाठी तिकीट मशीनमधील स्टॉपची नावे तातडीने दुरुस्त करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
