सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आई-वडिलांच्या स्मृतींना सामाजिक कार्याची अनोखी आदरांजली वाहण्यात आली. जे. बी. सराफ ज्वेलर्स, उरुळी कांचन यांच्या वतीने कै. विष्णुपंत भानुदास बेदरे व कै. श्रीमती प्रमिला विष्णुपंत बेदरे यांच्या स्मरणार्थ महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित महात्मा गांधी विद्यालयातील गरजू, हुशार व होतकरू ७५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

शनिवारी (ता. १५) उरुळी कांचन येथील श्रीराम मंदिर, सराफ बाजार, आळी येथे हा भावस्पर्शी कार्यक्रम झाला. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांचेही मन भरून आले. शिक्षणासाठी दररोजचा प्रवास सुलभ व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी ज्ञानोबा तुळशीराम कांचन, राजेंद्र तुळशीराम टिळेकर, महादेव तुकाराम कांचन, राजाराम आबुराव कांचन, सोपान सखाराम कांचन, देविदास बी. भन्साळी, प्रा. के. डी. कांचन, अमोल बेदरे, प्रसाद बेदरे, गणेश बेदरे, जयश्री बेदरे, सुरेखा भन्साळी, सचिन जगताप तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्योजक जयप्रकाश बेदरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. “उरुळी कांचन गावाने मला नवी ओळख दिली. समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा उपक्रम राबविला आहे. हे सामाजिक कार्य यापुढेही अखंडपणे सुरू राहील,” असे जयप्रकाश बेदरे यांनी सांगितले.

माझ्या यशामागे माझे वडील कै. विष्णुपंत भानुदास बेदरे आणि आई कै. श्रीमती प्रमिला विष्णुपंत बेदरे यांचे संस्कार आहेत. माझे व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृती जपत समाजासाठी काहीतरी करता येते, याचे समाधान आहे,” असे सांगताना जयप्रकाश बेदरे भावुक झाले.

कार्यक्रमाचे आयोजन अमोल बेदरे, प्रसाद बेदरे व गणेश बेदरे यांनी केले होते. सूत्रसंचालन पुरुषोत्तम काकडे यांनी केले, तर ॲड. प्रसाद बेदरे यांनी आभार मानले. आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी समाजाच्या उपयोगी लावत विद्यार्थ्यांच्या हातात सायकली देण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी कृतज्ञतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश ठरला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *