
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : श्रावण मासाच्या पवित्र पर्वात श्री क्षेत्र भुलेश्वर यात्रेच्या पारंपरिक काठी-पालखी सोहळ्यानिमित्त यवत (ता. दौंड) येथे ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘भुलेश्वर राजा ग्रुप, यवत’ यांच्या वतीने आयोजित या सप्ताहात धार्मिक परंपरा, लोकसंस्कृती आणि उत्साहाचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.

शनिवार (दि. १५) रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत श्री महादेव ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘अघोरी टीम’चे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण, ‘तिरंगा ढोल-ताशा पथका’चा दणदणाट, साईनाथ साऊंडचा निनाद, आकर्षक सजविलेला रथ तसेच फटाक्यांची आतषबाजी हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यामुळे संपूर्ण यवत परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

गुरुवारी (दि. १३) सकाळी सात वाजता यवत येथून श्री क्षेत्र भुलेश्वर (ता. पुरंदर) मंदिराकडे काठी-पालखीचे प्रस्थान झाले. रंगीबेरंगी वस्त्रे, फुलांच्या माळा आणि मयूरपिच्छांनी सजविलेली उंच सासनकाठी खांद्यावर घेत भाविकांनी अनवाणी पायांनी भुलेश्वर डोंगराची चढण पूर्ण केली. गावठाणातून पालखीचे प्रस्थान होताना ठिकठिकाणी सडे, आकर्षक रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी करून भाविकांनी पालखीचे स्वागत केले.

भुलेश्वर मंदिरात महादेवाला अभिषेक करण्यात आला. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि ‘भुलेश्वराय नमः’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भक्तिभाव व्यक्त केला.

भुलेश्वर देवाचे दर्शन घेऊन काठी-पालखी यवतमध्ये परतल्यानंतर गणेश बाळासाहेब दोरगे यांच्या निवासस्थानी दुपारचा विसावा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर गावातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रात्री नऊ ते अकरा या वेळेत झालेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
भुलेश्वर राजा ग्रुपच्या नियोजनामुळे संपूर्ण काठी-पालखी व मिरवणूक सोहळा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
बापुराव चौधरी उपसंपादक
