
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : दौंड तालुक्यातील भरतगाव येथील हर्षदा किरण नवले आणि हर्षल किरण नवले या बहीण-भावंडांनी एनसीसी रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भरतगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अमरावती येथे ३६ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेत दोघांनीही उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

हर्षदा व हर्षल हे हिंजवडी येथील ब्लू रिड्ज पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, एनसीसीच्या माध्यमातून त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील यशामुळे त्यांची ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या या कॅम्पमध्ये दोघांना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या यशामागे शाळेतील शिक्षक तसेच एनसीसी मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे. विशाल मालपोटे सर आणि लालसिंग चड्डा सर यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली हर्षदा व हर्षल यांनी कठोर सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षदा व हर्षल यांचे अभिनंदन करून त्यांना ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प २०२६ साठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातून आलेल्या या बहीण-भावंडांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून, राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हर्षदा आणि हर्षल यांच्या यशाबद्दल भरतगावसह दौंड तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. पालक, ब्लू रिड्ज पब्लिक स्कूलचे शिक्षक, एनसीसी अधिकारी, मार्गदर्शक तसेच ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता, मेहनत आणि जिद्द असेल, तर योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ते राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, हे हर्षदा-हर्षल यांच्या यशाने अधोरेखित केले आहे. दिल्लीतील राष्ट्रीय कॅम्पमध्येही दमदार कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
