
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांच्याकडे केली.

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असलेली शेतीची अवजारे, बी-बियाणे व इतर निविष्ठा वेळेत उपलब्ध झाल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे पेरणी व कापणीच्या हंगामापूर्वीच या योजनांची अंमलबजावणी सुरू करणे गरजेचे असल्याचे काकडे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेकडून कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंपसेट, प्लास्टिक ताडपत्री, पीव्हीसी पाईप, भातलावणी यंत्र, बॅटरी स्प्रेअर पंप आदी सुधारित कृषी अवजारांचा लाभ दिला जातो. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत मुक्तसंचार गोठा, मिल्किंग मशीन, मुरघास युनिट, गोठा रबर मॅट, कडबाकुट्टी मशीन यांसह एकल महिलांना सुधारित जातीचे तलंगा पक्षी व दोन शेळ्यांचे वाटप केले जाते. या योजनांमुळे शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक व्यवसाय अधिक सुलभपणे करता येण्यास मदत होते.

या योजनांची DBT पद्धतीने अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सभापती युवराज काकडे यांनी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच योजना ऑफलाईन पद्धतीनेही सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

मागील काही वर्षांत योजना ऑनलाइन पद्धतीने राबविताना सर्व्हर डाऊन होणे, तांत्रिक अडचणी तसेच ऑनलाइन प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहिल्याचे काकडे यांनी नलावडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावर सभापती अमोल नलावडे यांनी काकडे यांचे निवेदन प्राप्त होताच याबाबतच्या हालचाली गतिमान करण्यात येतील. पुढील आठवड्यापासून DBT योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
बापुराव चौधरी उपसंपादक
