सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : वाढदिवस म्हटला की केक, शुभेच्छा आणि अनावश्यक खर्च, असे चित्र आजच्या काळात पाहायला मिळते. मात्र, वाढदिवसाचा खर्च टाळून तोच आनंद समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर फुलविण्याचा आदर्श उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा श्री काळभैरवनाथ सेवा समितीचे विश्वस्त सुनील (आबा) आबुराव तांबे यांनी घालून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ८) आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्याचा जागर व सामाजिक उपक्रम शिबिरा’तून शेकडो नागरिकांना आरोग्यसेवा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला.

शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र तुळशीराम टिळेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन होते. यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य के. डी. (बापू) कांचन, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे संचालक राजाराम आबुराव कांचन, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद तुळशीराम जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात नागरिकांची बीपी, शुगर, बीएमआय, ईसीजी, हिमोग्राम आदी तपासण्या करण्यात आल्या. बालरोग व स्त्रीरोग तज्ज्ञांनी नागरिकांची तपासणी करून विविध आजारांबाबत मोफत मार्गदर्शन केले. गरजू रुग्णांना पुढील तपासणी, औषधोपचार तसेच शस्त्रक्रियेसंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमातून शासकीय योजनांचा लाभही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. रेशन कार्ड (स्मार्ट कार्ड) १०५, एनसीएमसी कार्ड ८५, महा आयडी ११२, बांधकाम कामगार योजना ६६ आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत २४३ लाभार्थ्यांना सुविधा देण्यात आली. याशिवाय ३० नागरिकांना नवीन रेशन कार्ड मिळवून देण्यात आले.

ईसीजी व रक्तदान शिबिरात ७० जण सहभागी झाले, तर तब्बल ४७५ नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. मोफत औषधांसह आयोजित आरोग्य शिबिराचा सुमारे १५० नागरिकांनी लाभ घेतला.

वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःसाठी खर्च करण्याऐवजी समाजातील गरजूंसाठी आरोग्यसेवा, औषधोपचार, चष्मे, रक्तदान आणि शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा तांबे यांचा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला. ‘वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या वेळी संतोष हरिभाऊ कांचन, संतोष आबासाहेब कांचन, मिलिंद मेमाणे, रामदास चौधरी, महादेव कांचन, सुदर्शन चौधरी, खेमचंद पुरुषवाणी, शरद वनारसे, संजय टिळेकर, भाऊसाहेब कांचन, शुभाष लोणकर, अलंकार कांचन, संतोष चौधरी, मयूर कांचन, शुभाष टिळेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *