सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : शिक्षणाच्या वाटेवर संगीताची सुरेल साथ लाभली की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी झळाळी प्राप्त होते. अशाच सुरेल वातावरणात उरुळी कांचन येथील साने संगीत विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारोह उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करीत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.

सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्पा लेले होत्या. साहित्यिक विनोद अष्टुळ आणि युवा उद्योजक सागर बाळासाहेब कांचन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व संबंधित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना साहित्यिक विनोद अष्टुळ म्हणाले, “संगीत ही केवळ कला नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. संगीतामुळे आत्मविश्वास, शिस्त, एकाग्रता आणि सर्जनशीलता विकसित होते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत नियमित सराव, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करावे.” सार्वजनिकरित्या होणारा गुणगौरव विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला नवी उमेद देतो. मिळालेले यश हे अंतिम ध्येय न मानता त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रगती साधावी, असेही अष्टुळ यांनी सांगितले.


संगीतकार व गायक तथा मार्गदर्शक शिवराज ज्ञानोबा साने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचा परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला. या यशाबद्दल कु. ओमकार बगाडे, श्रीशा काकडे, वेदांत कुतवळ, पार्थ बोत्रे, साई जाधव, वैष्णवी साळुंखे, पूर्वी ठाकरे, रियान पराग, आरोही साळुंखे, कृष्णा लहोरे, सृष्टी भोसले, ऋतुजा आवळे, हर्षद बोबडे, सुयश घनवट, शौर्य सुरवसे आणि संकेत खंडागळे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, नियमित सराव तसेच शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे मान्यवरांनी नमूद केले. आपल्या पाल्यांचा सार्वजनिकरित्या होणारा सन्मान पाहताना पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव उमटले. विद्यार्थ्यांना कलेचे व्यासपीठ मिळणे आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाणे ही त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी बाब असल्याचे पालकांनी सांगितले.

सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेखा शिवराज साने यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, महानुभाव पंथाचे महंत गोपालव्यास कपाटे, लोकमतचे पत्रकार सहदेव खंडागळे, महासुपर फास्ट न्यूज संपादिका सुवर्णा कांचन, महाराष्ट्राची भूमीचे पत्रकार बापुसो चौधरी, गुरुदत्त तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनिल तुपे यांच्यासह पालक, विद्यार्थी, संगीतप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज साने यांनी केले. सूत्रसंचालन रोहिदास बिचकुले यांनी केले, तर पत्रकार अमोल भोसले यांनी आभार मानले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *