किशोर (बापू) मेमाणे (उद्योजक, मेमाणे फॉर्म) यांचा खास लेख

आयुष्यात अनेक माणसे भेटतात, अनेक नाती निर्माण होतात; मात्र आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या गुरुजनांचे ऋण आणि त्यांच्या प्रेमळ आठवणी मनाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी जपल्या जातात. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि जीवनाची दिशा यांची परतफेड कधीच होऊ शकत नाही. याच गुरु ऋणाची जाणीव आणि कृतज्ञतेची भावना मनात ठेवून महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन येथील माजी विद्यार्थ्याने आपल्या गुरुजनांसाठी आयोजित केलेला स्नेहमेळावा भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.

सोमवारी (२३ नोव्हेंबर) मेमाणे फॉर्म येथे विद्यालयातील माजी निवृत्त शिक्षकांचा अनोखा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे सर्वत्र होत असतात; मात्र ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवले, त्यांच्या जीवनाला दिशा दिली, अशा गुरुजनांना एकत्र आणून त्यांच्या आनंदासाठी पुढाकार घेणे, ही संकल्पना खऱ्या अर्थाने आदर्शवत ठरली.

१९८० आणि १९९० च्या दशकात महात्मा गांधी विद्यालयात ज्ञानदान करणारे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची गोडी निर्माण करणारे शिक्षक आज सेवानिवृत्त जीवन जगत आहेत. अनेक वर्षांपासून या गुरुजनांना एकत्र आणून त्यांच्या सहवासात आनंदाचे क्षण निर्माण करण्याची इच्छा माजी विद्यार्थी म्हणून माझ्या मनात होती. हुर्डा पार्टीच्या हंगामाचे निमित्त साधत ही इच्छा प्रत्यक्षात साकार केली.

तब्बल ३० ते ३५ वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या गुरुजनांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. जुन्या आठवणींचा पेटारा उघडला आणि शाळेतील प्रसंग, विद्यार्थ्यांच्या खोड्या, अध्यापनातील अनुभव, सहकाऱ्यांसोबतचे क्षण अशा आठवणींना उजाळा मिळाला. हास्य, गप्पा आणि भावनिक क्षणांनी संपूर्ण परिसर आनंदमय झाला.

एकेकाळी विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या वाटेवर चालायला शिकवणारे गुरुजन आज जुन्या सहकाऱ्यांच्या सहवासात बालपणीच्या आठवणींमध्ये रमले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून माझ्या प्रयत्नांचे सार्थक झाले.
शिक्षकांचे ऋण फेडणे अशक्य असले, तरी त्यांच्या आयुष्यात आनंदाचा एक दिवस निर्माण करणे हेच मोठे समाधान आहे.

हा स्नेहमेळावा केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम न ठरता गुरु-शिष्य नात्यातील प्रेम, आदर, कृतज्ञता आणि ऋणानुबंध जपणारा एक हृदयस्पर्शी सोहळा ठरला. गुरुजनांना मनःपूर्वक वंदन करत या अविस्मरणीय दिवसाची सांगता झाली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *