सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : वाढदिवसाचा आनंद केवळ जल्लोषात न साजरा करता तो समाजाच्या उपयोगी यावा, या सामाजिक जाणिवेतून उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व काळभैरवनाथ सेवा समितीचे विश्वस्त सुनील (आबा) तांबे यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत विविध आरोग्य तपासण्या, शासकीय योजनांची नोंदणी आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (ता. ८) सकाळी ९.३० वाजता बायफ रोड, उरुळी कांचन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. या शिबिरात बीपी, शुगर, बीएमआय, हिमोग्लोबिन, रक्तदाब यांसह विविध आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच बालरोग व स्त्रीरोग तज्ज्ञांकडून नागरिकांना मोफत तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे.

शिबिराच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप, अँजिओग्राफीसाठी मार्गदर्शन, महा-ई-सेवा व महा आयडी कार्ड नोंदणी आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विश्व निर्भय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी नोंदणी केली जाणार आहे. पात्र कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नवीन एसटी बस एनसीएमसी स्मार्ट कार्ड यासाठीही नोंदणीची सुविधा उपलब्ध असणार आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासाठी आयुष्मान कार्ड तयार करून देण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील गरजू कुटुंबे, महिला, ज्येष्ठ नागरिक व बांधकाम कामगारांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. समाजाच्या गरजा ओळखून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार देण्याचा प्रयत्न असल्याचे सुनील आबा तांबे यांनी सांगितले.

या उपक्रमास परिसरातील मान्यवर, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीसह विविध शासकीय व सामाजिक सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *