पुणे : जिल्ह्यातील शिंदवणे येथे घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात तरुण पिढी विविध क्षेत्रांत यश संपादन करत असताना आपल्या संस्कृतीशी नाळ जपणारे असे प्रेरणादायी उदाहरण क्वचितच पाहायला मिळते.

शिंदवणे येथील श्री छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुलातील आखाड्यात सराव करणाऱ्या कु. अर्णवी भाऊसाहेब महाडिक हिने आपल्या आयुष्यातील पहिली कमाई गुरूंच्या चरणी अर्पण करत गुरू-शिष्य परंपरेचा आदर्श समाजासमोर ठेवला. कुस्तीच्या माध्यमातून शिंदवणे यात्रेतील आखाड्यात मिळालेली ही पहिली कमाई तिने आपल्या वस्तादांना अर्पण करत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

“गुरूंमुळेच आज मी या टप्प्यावर पोहोचले,” असे सांगताना अर्णवीच्या डोळ्यांत अभिमान आणि कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते. या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.

कुस्ती हा केवळ खेळ नसून शिस्त, मेहनत आणि संस्कार यांचा संगम आहे. आखाड्यातील गुरू वस्ताद पै. शरद महाडिक हे शिष्यांना केवळ खेळाचे धडे देत नाहीत, तर आयुष्य घडवण्याचे संस्कारही देतात. या घटनेतून या परंपरेची प्रचिती पुन्हा एकदा आली.

यावेळी आदर्श शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक, शिंदवणेचे माजी उपसरपंच संभाजी महाडिक, हवेली तालुका शिवसेना माजी उपविभागप्रमुख व संचालक युवराज महाडिक, पत्रकार अमोल महाडिक, सागर नायकुडे आदी उपस्थित होते.

गावातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “आजच्या काळात पैशाला अधिक महत्त्व दिले जाते; मात्र अर्णवी महाडिक हिने संस्कार आणि कृतज्ञतेला प्राधान्य दिले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे मत माजी उपसरपंच संभाजी महाडिक यांनी व्यक्त केले.

या प्रेरणादायी कृतीमुळे इतर तरुणांनाही गुरूंचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळत असून, कुस्ती परंपरेतील गुरू-शिष्य नात्याची महती पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, अर्णवी महाडिक ही आदर्श शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक यांची कन्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *