बापुराव चौधरी, उपसंपादक
पिंपरी-चिंचवड : बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमांतर्गत पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार केलेल्या बेंच व प्लास्टिक संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले.

पीसीएमसी मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात महापौर रवी बाबासाहेब लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या प्रसंगी उपमहापालिका आयुक्त तथा आरोग्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप थेंगल, घनकचरा व्यवस्थापन विभाग व सीएसआर सेलमधील अधिकारी उपस्थित होते.

बिसलेरीकडून सस्टेनेबिलिटी व कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक के. गणेश यांनी उपक्रमाची माहिती दिली.
‘कचरा जिथे तयार होतो तिथेच वर्गीकरण’ या तत्त्वावर आधारित जनजागृती, मोहिमा आणि शैक्षणिक संस्थांशी सहकार्य यामुळे शहरात कचरा व्यवस्थापनाची सवय रुजत असल्याचे गणेश यांनी सांगितले.
भारतात शाश्वत कचरा व्यवस्थापन ही सर्वसामान्य पद्धत व्हावी, यासाठी विविध संस्थांशी भागीदारी वाढवण्यावर कंपनीचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर लांडगे म्हणाले, “प्रशासन आणि उद्योग एकत्र आल्यास प्रभावी परिणाम साधता येतात. या उपक्रमामुळे लँडफिलमध्ये जाणारा कचरा कमी होईल, नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि सर्क्युलर इकॉनॉमीसाठी भक्कम पाया तयार होईल.” डॉ. थेंगल यांनीही मजबूत प्रणाली उभारून मोठ्या प्रमाणावर कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यावर भर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडमधील आठ शैक्षणिक संस्थांना वर्षभर सातत्याने प्लास्टिक संकलन केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 2025-26 मध्ये पीसीएमसीने 219 मेट्रिक टन प्लास्टिक संकलित केले, तर देशभरात बिसलेरीने 30,309 मेट्रिक टन प्लास्टिक पुनर्वापरासाठी पाठवले आहे.
‘ग्रीनर प्रॉमिस’ मोहिमेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे पुनर्वापर, जलसंधारण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाला चालना मिळत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.