
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
हा सत्कार महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पार पडला. त्यांच्या हस्ते झालेला हा सन्मान डॉ. गिते यांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रातील दीर्घकालीन, प्रभावी आणि समाजहितकारी कार्याची दखल मानला जात आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. गिते यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती, युवक प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. राज्यभरातील हजारो युवक, पालक आणि नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्रदान केला होता. हा राज्यस्तरीय पुरस्कार मा. संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ आणि प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

डॉ. गिते यांच्या कार्याबाबत राज्यपालांसह विविध सामाजिक संस्था, मान्यवर आणि लोकप्रतिनिधींनी प्रशंसापत्रे व शिफारसपत्रांच्या माध्यमातून गौरव व्यक्त केला आहे. त्यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त असून सामाजिक कार्याशी संबंधित अनेक जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नोंदविण्यात आले आहेत. तसेच त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी डॉ. गिते यांच्या व्यसनमुक्ती चळवळीतील समर्पित कार्याचे कौतुक करत, समाजात व्यसनमुक्त, सुसंस्कारित आणि सशक्त पिढी घडविण्यासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे जावे, अशा शुभेच्छा दिल्या.
बापुराव चौधरी उपसंपादक