बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : केवळ इतर गायकांचे अनुकरण करून गाणे सादर करणे पुरेसे नसून, गाण्यांतील भाव समजून ते प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पं. उपेंद्र भट यांनी केले.

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित २४ व्या ‘पुणे आयडॉल’ गायन स्पर्धेचे उद्घाटन पं. भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ही स्पर्धा दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, अध्यक्षा स्वाती निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड, मयुरी कोकाटे, बिपिन मोदी, वसंतराव जुनवणे, ज्ञानेश्वर मुरकुटे तसेच परीक्षक जितेंद्र भूरूक व मनीषा निश्चल उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पं. भट म्हणाले की, गायन ही परिवर्तन घडवणारी प्रभावी कला असून त्यात अर्थपूर्णता असणे गरजेचे आहे. हौसेने गाणाऱ्यांनीही शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आत्मसात करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी पं. भीमसेन जोशी, किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘रस बरसत अमृत वेणा’ हे युगुलगीत सादर करून त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, संगीत ही समाजात सकारात्मक बदल घडवणारी कला आहे. प्रत्येकाने व्यावसायिक गायक होणे शक्य नसले तरी गायनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. “शंभर भाषणांपेक्षा एक गाणे अधिक प्रभावी ठरते,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांनी अधोरेखित केला.

प्रास्ताविकात स्वाती निम्हण यांनी सांगितले की, ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भविष्यात ही स्पर्धा ‘महाराष्ट्र आयडॉल’ म्हणून विस्तारेल. नवोदित गायकांसाठी ही स्पर्धा हक्काचे व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेत मृणाल देशपांडे (वय ४) आणि अमर गोसावी (वय ८०) यांचा सहभाग विशेष ठरला आहे. नागपूर, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर व मुंबई येथून एकूण ५६० स्पर्धक सहभागी झाले असून तीन दिवस प्राथमिक फेरी पार पडणार आहे. त्यानंतर अंतिम फेरी आयोजित करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभात मान्यवरांचे स्वागत उमेश वाघ यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमित मुरकुटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *