सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पिंपरी : पंढरीची वारी हा जगातील एकमेव असा सोहळा असून, यात सर्व अठरा पगड जातीधर्मातील वारकरी एकत्र येऊन सहभागी होतात. देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंतच्या वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान अवघ्या अडीच तासांत देण्याचा प्रयत्न ‘अंतर्नाद’ या भव्य संगीत नाटकातून करण्यात आला आहे. अभंग, गवळण, भारूड आणि पोवाड्यांचा समावेश असलेल्या या सात्विक प्रयोगात तब्बल ५१ कलाकार सहभागी होत आहेत.

‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी (दि. १६) सायंकाळी ७ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा मोरया थिएटर्सचे संस्थापक आणि नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी दिली. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदी उपस्थित होते.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘वारीचे महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचावे आणि त्यातून प्रेरणा मिळावी, हा ‘अंतर्नाद’चा उद्देश आहे. संतांविषयी अनेक साहित्यकृती आणि अभंग उपलब्ध असले तरी या नाटकात कोणतीही नक्कल करण्यात आलेली नाही. सर्व साहित्य नव्याने साकारले आहे. लोकसंगीतातील बहुतांश पारंपरिक वाद्यांचा वापर या नाटकात करण्यात आला आहे. स्वतःमधील विठ्ठल शोधण्यासाठी आणि अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकाने ‘अंतर्नाद’ अनुभवावा.’’
दरम्यान, या नाटकाचा दुसरा प्रयोग शुक्रवारी (दि. २२ मे) सायंकाळी ७ वाजता हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात होणार असल्याची माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली. नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू आहे.
आत्म्याशी संवाद साधणारा भावस्पर्शी प्रवास
‘अंतर्नाद’ हे केवळ नाटक नसून आत्म्याशी संवाद साधणारा भावस्पर्शी प्रवास आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचे जिवंत चित्रण यातून साकारण्यात आले आहे. दिंडीत सहभागी झालेल्या एका युवा वारकऱ्याच्या विठ्ठल भक्तीमधून घडणारा अंतर्मनाचा प्रवास हे या नाटकाचे प्रमुख कथानक आहे.
नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळिंबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांनी दिले असून, गीतलेखन मुराद तांबोळी यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. प्रकाश योजना अभिप्राय कामठे, रंगभूषा कमलेश बिचे, तर वेशभूषेची जबाबदारी वेदिका काळे यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक