
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोपोडी परिसरातील मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून प्रभाग क्रमांक ८ मधील नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी गुडघाभर पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली.

या परिस्थितीला नदी सुधार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप उपमहापौर वाडेकर यांनी केला. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे निम्मी बोपोडी पाण्याखाली गेली आहे. आदर्श नगर, कोटकर लेन, मंत्री रिवेरा, गोयल-शिंदे पार्क, बोपोडी स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान परिसर, चिखलवाडी आणि पडाळ वसाहत या भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

वाडेकर म्हणाले, नदीवरील नवीन पुलांच्या कामादरम्यान उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलांचे सांगाडे अद्याप नदीपात्रातच असल्याने पाण्याचा प्रवाह अडत आहे. याबाबत नदी सुधार प्रकल्पाचे अधिकारी गोजारे यांच्या निदर्शनास अनेकदा बाब आणून दिली असून सभागृहातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नदीला मोठा पूर न येताही बोपोडी परिसर जलमय झाल्याचा दावा त्यांनी केला.

परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, आनंद छाजेड, नगरसेविका सपना छाजेड, अविनाश कदम, आप्पासाहेब वाडेकर, उपायुक्त (परिमंडळ क्र. २) अविनाश सपकाळ तसेच औंध-बोपोडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांनी बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत संबंधित अधिकाऱ्यांना मदतकार्य, पाणी उपसा, स्वच्छता, आरोग्यविषयक उपाययोजना आणि आवश्यक यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, बोपोडीतील परिस्थितीची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना देण्यात आली असून त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत उद्या दुपारी यासंदर्भात आढावा बैठक बोलावल्याची माहिती उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली.
बापुराव चौधरी उपसंपादक
