पुणे : हवेली तालुक्यातील सांगवी सांडस येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिलाला वनविभागाने तत्पर कारवाई करत सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. शुक्रवारी (ता. ३) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सांगवी सांडस येथील श्री. सर्जेराव मानसिंग सातव यांच्या गट क्रमांक ३०३ मधील विहिरीत बिबट्याचे पिलू पडल्याचे स्थानिकांना आढळून आले. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. यानंतर वनसंरक्षक (प्रा.) आशिष ठाकरे व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या नेतृत्वात बचावकार्य हाती घेण्यात आले.

वनकर्मचारी व बावधन येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने अत्यंत दक्षतेने आणि सुरक्षित पद्धतीने बिबट्याच्या पिलाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बचावानंतर त्या पिलाला वैद्यकीय तपासणीसाठी बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण कार्यवाहीत वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, वनरक्षक अनिल राठोड, अंकुश कचरे, पूजा कुबल, प्रिती नागले, प्रिया अकेन, कोमल सपकाळ, रुतुजा कचरे तसेच वनसेवक बापू बाजारे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, या बचाव मोहिमेदरम्यान लोणीकंद पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती सुनीता राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

वनविभागाच्या या तत्पर आणि समन्वयपूर्ण कार्यवाहीमुळे बिबट्याच्या पिलाचे प्राण वाचले असून नागरिकांकडून या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *