बकोरी : “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीला साजेसा आदर्श समाजापुढे ठेवत बकोरी येथील वारघडे परिवाराने मातृस्मृतीतून हरित संस्कारांचा अनोखा संदेश दिला आहे. बकोरी देवराई वनराईचे निर्माते तसेच माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या मातोश्री व दत्तकृपा विविध कार्यकारी सोसायटीच्या संस्थापिका स्व. कमल गोविंद वारघडे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त तब्बल एक हजार ‘लक्ष्मीतरु’ या बहुमोल वृक्षांच्या रोपट्यांचे वाटप करून त्यांना अभूतपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते प्रभाकर जगताप यांनी ‘लक्ष्मीतरु’ या वृक्षाचे महत्त्व अधोरेखित करत, तो बहुगुणी व औषधी असून कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर प्रभावी ठरत असल्याचे सांगितले. परिसर हरित करण्यासाठी अशा वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

“झाडे लावा, झाडे जगवा… पाणी अडवा, पाणी जिरवा” या ध्येयाने प्रेरित होऊन चंद्रकांत वारघडे यांनी देवराई वनराई प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सुमारे दोन लाख वृक्षांची लागवड केली असून एक कोटी वृक्ष लागवडीचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा जपत वारघडे परिवाराने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

युवा प्रवचनकार प्राजक्ता झेंडे-करंदी यांनी आपल्या प्रभावी वाणीमधून स्व. कमल वारघडे यांच्या आयुष्यातील दानधर्म व समाजकार्यातील योगदानाचे भावपूर्ण स्मरण केले. आमदार बापूसाहेब पठारे यांनी, “वारघडे यांचे वृक्ष व पक्ष्यांवरील प्रेमच आजच्या ‘काकस्पर्शा’तून प्रकर्षाने जाणवले,” असे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अंधश्रद्धेला बळी न पडता सामाजिक कार्यातून आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भोंडवे यांनीही पारंपरिक अंधश्रद्धांना फाटा देत आधुनिक व पर्यावरणपूरक परंपरा जोपासल्याबद्दल वारघडे परिवाराचे विशेष अभिनंदन केले.

या कार्यक्रमास राज्यभरातून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, पर्यावरणप्रेमी तसेच माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारघडे परिवाराच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, मातृस्मृतीतून रुजवलेला हरित संदेश समाजमनाला स्पर्शून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *